1 ली ते इ.8वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम RTE act 2009 नुसार वर्गोन्नती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांच्या वर्गोन्नतीबाबत राज्याचे शैक्षणिक प्राधिकरण म्हणून असलेल्या अधिकाराचा वापर करून खालील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
१. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये ज्या विद्यार्थांचे आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. २ अन्वये नमूद नियमित कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.
२. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये शिक्षकांनी विविध साधन तंत्रांचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारित करण्यात यावी.
३. शैक्षणिक सत्र २०२० २०२१ मध्ये कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक, संकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. ५ अन्वये शासनाने सूचित केल्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर "आर.टी.ई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्रत" असा शेरा नमूद करण्यात यावा. याव्यतिरिक्त इतर कोणताही शेरा नमूद करण्यात येऊ नये.
४. उपरोक्त मुद्दा १ व २ मधील क-२ पेक्षा कमी श्रेणी मिळालेले विद्यार्थी व मुद्दा ३ मधील सर्व विद्यार्थी तसेच बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम चार प्रमाणे वयानुरूप दाखल होणारे विद्यार्थी यांच्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी. तसेच नियमित वर्गाअध्यापनाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात यावी
५. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करताना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे नव्याने कोणत्याही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन/ ऑफलाईन प्रकारे मूल्यमापन करण्यात येऊ नये.
६. उपरोक्त सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक, संचयी नोंद पत्रक इ. अभिलेखे नियमित वेळेत पूर्ण करण्यात यावेत व स्थानिक परिस्थितीनुरूप वितरीत करण्यात यावेत.
७. यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरून मूल्यमापना बाबत इतर कोणत्याही सूचना शाळांना देण्यात येऊ नयेत.
८. सदर सूचना राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाव्या शाळांना लागू राहतील.
९. कोविड- १९ च्या संदर्भात स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे.
कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक सत्र २०२० - २०२१ मध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरिता पुढील शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने कृतीकार्यक्रम विकसित करण्यात येतील. यासंदर्भात सविस्तर सूचना यथावकाश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
निकालपत्रक नमूना - RTE act कलम १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा असलेले निकालपत्रक नमूना डाउनलोड करण्यासाठी येथे खालील इमेज वर क्लीक करा.