16 सप्टेंबर: ओझोन दिन माहिती ...
१९९५ सालापासून दरवर्षी १६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” साजरा केला जातो.
ओझोन थराच्या संरक्षणासाठी १९८७ साली ह्या दिवशी कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या.
हा करार होता ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा.
पृथ्वीला आणि पर्यायाने पृथ्वीवासीयांना घातक गोष्टींपासून वाचवणार्या ओझोन थराचे संरक्षण करण्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्नशील असते.
पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचवण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याची जाणीवही हा दिवस आपल्याला करून देतो.
ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे लिहितात.
क्रिस्टियन फ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने १८४० साली ओझोनचा शोध लावला.
ग्रीक भाषेतील वास घेणे ह्या अर्थी असलेल्या “ओझेइन” ह्या शब्दापासून ओझोन हा शब्द तयार झाला आहे.
ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो. वातावरण म्हणजे प्रत्येकी १ किमी उंचीच्या १४० मजल्यांची इमारत आहे असे मानले, तर १६ मजल्यांपर्यंतचा (जमिनीपासून १० ते १६ किमीपर्यंतचा) वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (troposphere).१७ ते ५०व्या मजल्यांपर्यंतचा (तपांबराच्या वर ५० किमी ) थर म्हणजे स्थितांबर.
ओझोनच्या वातारवणातील एकूण प्रमाणाच्या १० टक्के ओझोन तपांबरात तर उरलेला ९० टक्के ओझोन स्थितांबरामध्ये (stratosphere) आढळतो.
16 सप्टेंबर: ओझोन दिन माहिती व ओझोनचा थर शोध
स्थितांबरातील ओझोनच्या ह्या मोठ्या प्रमाणामुळे ह्या थराला “ओझोनचा थर” असेही म्हणतात. ओझोनचे वातावरणातील प्रमाण सर्वत्र सारखे नसते.
ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.
जैविक पदार्थांच्या दहनातून, तसेच काही वायू आणि प्रदूषकांतील नैसर्गिकरीत्या घडणार्या रासायनिक अभिक्रियांमधून निर्माण होणारा ओझोन हा तपांबरातील (troposphere) ओझोनचा मुख्य स्रोत. तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे.
तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते शेत्योत्पादनास तसेच जंगलांच्या वाढीस मारक ठरू शकते. फुफ्फुसांची क्षमता खालावणे, खोकला, घशाचे विकार वगैरेंसारख्या विविध श्वसनविकारांना आमंत्रण देते. ओझोनच्या विषारी गुणधर्मांमुळे हे श्वसनविकार मृत्यूसही कारणीभूत ठरू शकतात.